शेती मध्ये बदल हा अटळच


हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल हा गरजेचाच आहे; परंतु हा बदल नेमका कसा असावा, याबाबत अधिक संशोधन होऊन त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला हवे

पारंपरिक पिकांना कलाटणी, शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे, पीक पद्धतीतील बदलाने साधली समृद्धी आदी मथळ्यांखालील बातम्या अलीकडे वाढल्या आहेत. त्यास कारण म्हणजे मागील दीड दशकापासून हवामान बदलाचे वारे झपाट्याने वाहत आहेत. बदलत्या हवामानात पिकांची निवड करून उत्पादन घेणे, हे शेतकऱ्यांना अत्यंत जिकिरीचे ठरत असून, कृषी आणि हवामान तज्ज्ञांसमोरही हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे आहे. अशा बिकट प्रसंगी हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याचे सल्ले शेतकऱ्यांना पावलोपावली मिळत आहेत. मात्र, त्यांना पूरक पीक पद्धती, बदलत्या हवामानाशी समरस वाणे आणि बदलत्या परिस्थितीनुरूप तंत्रज्ञानात बदल याबाबत ठोस काही मिळताना दिसत नाही. शेतकरी स्वपुढाकाराने पीक पद्धतीत बदल करीत असले तरी यातून कुटुंब, देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येत आहे. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबियांएेवजी नगदी पिकांकडे वाढलेल्या कलामुळे अन्नसुरक्षेसाठी शेतकऱ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरचे अवलंबित्व वाढले आहे. कमी उत्पादकतेमुळे नगदी पिकांची विक्री आणि त्यातून अन्नधान्ये खरेदी याबाबत अनेक कुटुंबांचा ताळमेळ बसताना दिसत नाही. देशपातळीवरील परिणाम म्हणजे डाळी, खाद्यतेल हे तर आपण मोठ्या प्रमाणात आयात करीत असून, गव्हासारख्या पिकांचे देशात उत्पादन घटण्याच्या भीतीमुळे गव्हाची आयातही देशात सुकर केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पद्धतीतील बदलास अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढले असले तरी अशा शेतकऱ्यांची संख्या मात्र फारच कमी आहे.

 एका ग्रीक तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, ओन्ली थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज. अर्थात विश्वामध्ये बदल अटळ असून, तो सातत्याने होतच असतो. त्यामुळे हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल हा गरजेचाच आहे; परंतु हा बदल नेमका कसा असावा, याबाबत अधिक संशोधन होऊन त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला हवे. मुळात आपल्या देशात हवामान बदलाचा बारकाईने अभ्यास अजूनही होत नाही. त्यामुळे त्या बदलाचा सामना करीत कमीत कमी नुकसानात टिकून राहण्याबाबत मार्गदर्शन हे त्यापुढचे पाऊल झाले. मॉन्सूनच्या बदलत्या स्वरूपानुसार खरीप - रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, हवामान बदलावर आधारित शेतीसाठी प्रशिक्षण आणि हवामानाच्या अचूक 

अंदाजानुसार विभागनिहाय अचूक सल्ले या बाबींचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळायलाच हवा. सध्या शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन आणि सहज सोपी विक्री करता येणाऱ्या पिकांना प्राधान्य देत आहेत. यातून राज्यामध्ये बागायती शेतात ऊस, भाजीपाला तर जिरायती क्षेत्रात कापूस, सोयाबीन अशी पिके वाढत आहेत. खरे तर तीव्र पाणीटंचाईच्या काळात तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया अशा कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढायला हवे. यामध्ये ताण सहन करणाऱ्या अधिक उत्पादनक्षम वाणांच्या संशोधनावर भर देण्याची गरज आहे. शेतीमध्ये अन्नधान्ये, नगदी पिके, फळे, फुले, भाजीपाला अशी वैविध्यपूर्ण पिके असायलाच हवीत. मर्यादित क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य होत नाहीत. अशावेळी कृषी विद्यापीठांनी अन्नसुरक्षा आणि उत्पन्न सुरक्षेच्या अनुषंगाने परस्परपूरक आंतर आणि मिश्र पीक पद्धतींचे विविध मॉडेल्स शेतकऱ्यांपुढे मांडायला हवेत. पीक पद्धतीत बदल हा तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डोळसपणे व्हायला हवा. जिरायती शेतीत संरक्षित सिंचन; तसेच बारमाही बागायतीत पीक कोणतेही असो सूक्ष्म सिंचनाचाच वापर हे सूत्र शेतकऱ्यांनी पाठच करायला हवे. हे साध्य करण्याकरिता याबाबतच्या शासकीय योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचतील याची खबरदारी शासनाने घ्यायला हवी. याबाबत गंभीरतेने विचार केल्यासच भविष्यात आपली अन्नसुरक्षा टिकेल, हे लक्षात घ्यायला हवे

No comments:

Post a Comment

शेती मध्ये बदल हा अटळच

हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल हा गरजेचाच आहे ; परंतु हा बदल नेमका कसा असावा , याबाबत अधिक संशोधन होऊन त्यानुसार शेत...